आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे
आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे, - २
बाकी सारे आकार-उकार, होकार-नकार, - २
मागे पडत चाललेल्या स्टेशनासारखे,
मागे-मागे जात जात, पुसट होत चालले आहेत,
पुसत जावे ढगांचे आकार, आणि उरावं एकसाधं आभाळ, - २
तसा भूतकाळ....
त्याच्या छातीवर, गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग,
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले, बानाकृतीतील बगळे,
आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे....
विसरत चाललोय, -२ नावेतून उतरताना आधारासाठी धरलेला हात, - २
विसरत चाललोय, होडीची मनोगते, सरोवराचे बहाने,
व नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट,
ती लाट तर तेव्हांच पुसली, मनातल्या इच्छेसारखी, -२
सरोवर मात्र अजूनही तिथेच -२
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली -२
आता तर लाटा नव्हे, पाणी ही नवं आहे कदाचित - २
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखताय सगळे,
आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे....
तुझ्याकडे...तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मीही हट्टी - २
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी,
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे, अजूनही - २
थोडेसे शब्द... बरचसं मौन, अजूनही,
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत आपण - २
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू,
आणि आपले स्पर्श झालेले, हे सगळे...
आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे...
उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही, - २
पाऊले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत , - २
वाळूवरची अक्षरं, पुसट होत जातात,
तीव्रतेचे उग्र गंध, विरळ होत जातात,
शेपटीच्या टोकावरचे हट्ट, सरळ होत जातात,
विसरण्याचा छंद जडलायं आताशा मला, -२
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना,
विसरत चाललो आहे, पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, - २
विसरत चाललो आहे, ताळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ,
अन विसरत चाललो आहे, आभाळही गोंदायला विसरणारे, हिरवेगर्द तळे,
आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे...
Comments
Post a Comment