संविधानाचा पोवाडा

आधी नमन करू संतांना, समाजसुधारकांना, स्वातंत्र्यसैनिकांना
ज्यांनी भारताचा पाया रचिला,
संविधानाचा मार्ग दाविला,
चला जाणूया संविधानाला
जी... जी जी   

भारतात होती राजेशाही,
सरंजामशाही,
कुठे ठोकशाही
इंग्रजांच्याही सत्तेचा फास, जनसामान्या पुरते नाडण्यास,
राबविली सत्ता त्यांनी ती खास
जी...जी जी

भारताचे रूप पालटले,
राजे रजवाडे,
संस्थानिक गेले,
संविधानाच्या लेखणीचा वार
गुलामगिरीचे भोग झाले पार
लोकशाहीचे स्वप्न साकार
जी...जी जी

(चाल बदल)
भारतात होती राजेशाही,
तशी होती पुरोहितशाही
रं जी रं हा जी रं रं जी जी जी 

त्याचा पाया भेदभावाचा,
जातीभेद, वर्ण विषमतेचा
रं जी रं हा जी रं रं जी जी जी 

हा मार्ग स्त्री च्या शोषणाचा,
भारताच्या मागासपणाचा
रं जी रं हा जी रं रं जी जी जी 

(चाल बदल)
अमानुषपणाचेहे हे जीणे
संविधानाने
आपुल्या कायद्याने
दूर करण्याचे दिले बघा बळ
नाही राहिले काही अमंगळ
समता, बंधुता, न्यायाचे फळ
जी...जी जी

कुणी नाही लहान कुणी थोर
कायद्यासमोर
समान अधिकार
सर्वांना दिली सम समान पत
असो कुणीही नाही हरकत
एका व्यक्तीला असे एक मत
जी... जी जी

अभिव्यक्ती आणि भाषणाचा,
जमा होण्याचा, संघ बनवण्याचा
नागरिकांना आहे अधिकार
देशभर करा मुक्त संचार,
हवा तो धरा उदीम व्यापार
जी...जी जी

तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा
किंवा बदलण्याचा
निधर्मी राहण्याचा
संविधानाने दिला अधिकार
धर्मनिरपेक्ष मात्र सरकार
एकात्मतेचा मुख्य आधार
जी...जी जी

मोफत आणि सक्तीचा
कायदा शिक्षणाचा,
हक्क बालकाचा
संविधानाने केला स्वीकार
ऐतिहासिक असा हा विचार
समान संधीचे खुले केले द्वार
जी...जी जी

(चाल बदल)
हक्काला जागणार,
समजून घेणार,
आग्रही राहणार असावा
कर्तव्य टाळणार,
माग माग पळणार,
स्वतःपुरतं पाहणार नसावा
योग्य उमेदवार
करून विचार
मतदान करणार असावा
लाचार होणार,
पार्ट्या झोडणार,
जातीचा शोधणार नसावा
मतदारा...
मतदारा, ऐक रं जरा, वाग तू बरा 
रं जी रं हा, जी रं रं, जी जी जी 

नेता जरूर असावा
पण विसरून जाणार नसावा
निवडून येणार असावा
पण दारू पाजणार नसावा
रं जी रं हा, जी रं रं, जी जी जी
एकोपा करणार
माणसं जोडणार
विचार देणार असावा
धर्मा धर्मामध्ये
भांडण लावणार,
माणूस मारणार नसावा
मतदारा...
मतदारा, ऐक रं जरा, वाग तू बरा 
रं जी रं हा, जी रं रं, जी जी जी

(चाल बदल)
रक्ताविना साधण्या क्रांती
दिली तुझ्या हाती किती मोठी शक्ती
मताचं एक बटन दाबून
सहज आणू शकतो बदल घडवून
माणसा जरा घे हे समजून
जी... जी जी

शेवटी करतो विनंती
संविधाना प्रती उदासीन किती?
संकटे उभी किती देशात!
अस्त्र संविधान तुमच्या हातात
अंधारावर करुया मात
जी ...जी जी

स्थापून महा अंनिस
अंधश्रध्देस दूर करण्यास
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून
समाज बदलास आणले घडवून
दाभोलकरांनी आयुष्य देऊन
तरीही त्यांचा झाला का खून
जी... जी जी

मारिले जरी दाभोलकर
मैदानावर अजून कित्येक वीर
उभे ठाकले लढा लढण्यास
ज्योत विचारांची पुढे नेण्यास
ज्योत विवेकाची पुढे नेण्यास
शाहीर अर्पितो पोवाडा त्यांस
जी... जी जी

भारतीय संविधानाचा ....विजय असो!
विवेकाचा आवाज ....बुलंद करुया!
डॉ नरेंद्र दाभोलकर ....अमर रहे!
लढेंगे ....जीतेंगे! 

सुनील स्वामी, इचलकरंजी
9881590050

Comments

Popular posts from this blog

समतेच्या वाटेनं

युगायुगाची गुलामी चाल...

तिच्या बोलण्याचं ऐस..