साऊ पेटती मशाल...

साऊ पेटती मशाल,
साऊ आग ती जल्हाल ।
साऊ शोषितांची ढाल,
साऊ मुक्तीच पाउल ।।१।।

साद दिली पाखरांना,
सारं रान धुंडाळून,
फडफडते ते पंख,
झेपावलं नवं गाणं ।।१।।

साऊ वाघीण आमुची,
तिनं फोडली डरकाळी ।
थरथरल्या चाकोळ्या,
गढ ढासळले गं बाई ।।२।।

दुध ज्ञानाचे पाजीले,
गर्भ यातना सोसून ।
येल मांडवाला जाई,
ज्ञान चांदणं पिवूनं ।।३।।

हरणं चालली कळपात,
कशी निर्भय तोर्यातं ।
स्वाभिमानाने गावू,
आत्मभान पांघरूणं ।।४।।

घुसमट काळजाची,
माझ्या आज ही पदरी ।
कधी ढीली कधी जामं,
माझ्या वेसणाची दोरी ।।५।।

जरी मोकळा गं श्वासं,
माझं मन जायबंदी ।
झळाळते गं वरून,
अंधारलं आत मंदी ।।६।।

आता नको कोंडमारा,
नको विषारी हा वारा ।
नको दासीपन आता,
नको जुल्माचा पहारा ।।७।।

ज्योत लावलीस तू साऊ,
वणवा मी पेटवीनं ।
तुझं शिल्प कोरलेलं,
ते बोलकं मी करीनं ।।८।।

कवी - शितल साठे

Comments

Popular posts from this blog

समतेच्या वाटेनं

युगायुगाची गुलामी चाल...

तिच्या बोलण्याचं ऐस..