बुद्ध कबीर भीमराव फुले...

बुध्द कबीर भीमराव फुले, या भूमीवर जन्मले
त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीण सखये बाई !! धृ !!

देवाच्या नावावर, जे करती छूमंतर
ते भरती आपुली घरं ग, शेजारीण सखये बाई !! १ !!

देव अंगातला बडबडं, मान हालवून हात हात उडं
मागतो बकरं कोंबडं ग, शेजारीण सखये बाई !! २ !!

देव अंगात आल्यावर, दारूगांजा हवा भरपूर
गंडे दोरे खर्च नंतर ग, शेजारीण सखये बाई !! ३ !!

सुखदेवची देतो जीवा, पोरं देतो मागशील तवा
मग नवरा कशाला हवा गं , शेजारीण सखये बाई !! ४ !!

देव अंगात वागतो, जर शब्दाला जागतो
का भगत भीक मागतो ग, शेजारीण सखये बाई !! ५ !!

उपवासा नवसामुळं, ही बुध्दी मातीला मिळं
हे कसं तुला ना कळं ग, शेजारीण सखये बाई !! ६ !!

शेवटी सांगते ग आता, सोड साऱ्या भाकड कथा
भरडल्या जीवा किती व्यथा ग, शेजारीण सखये बाई !! ७ !!

त्या भीमरायानं दिला, एक जीवनमार्ग भला
पंचशीलच तारील तुला ग, शेजारीण सखये बाई !! ८ !!

मनी घेऊनी तू विश्वास, धर विज्ञानाची कास
प्रगतीचा मार्ग तुज खुला ग, शेजारीण सखये बाई !! ९ !!

- शा. लक्ष्मण केदारे

Comments

Popular posts from this blog

समतेच्या वाटेनं

युगायुगाची गुलामी चाल...

तिच्या बोलण्याचं ऐस..