सदैव सैनिका...

सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे

सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदैव काजळी दिसायच्या दिशा

मधून मेघ हे नभास ग्रासती, मध्येच या विजा भयाण हासती

दहा दिशातुनी तुफान व्हायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे...

प्रलोभने तुला न लोभ दाविती, न मोहबंधने पदास बांधती

विरोध क्रोध वा तुला न थांबवी, न मोह भासतो गजान्त वैभवी 

न दैन्य हे तुझे कधी सरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे... 

वसंत वा शरद् तुला न ती क्षिती, नभात सुर्य वा असो निशापती 

विदीर्ण वस्त्र हो मलिन पावले, तरी न पाय हे कधी विसावले

न लोचनां तुवां सुखें मिटायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे...

नभात सैनिका प्रभात येऊ दे, खगांसवे जगा सुखात गाउ दे

फुलाफुलावरी सुवर्ण शोभु दे, जगास शांतता सुहास्य लाभु दे 

न पाय तोवरी तुझे ठरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे... 

-वसंत बापट

Comments

Popular posts from this blog

समतेच्या वाटेनं

युगायुगाची गुलामी चाल...

तिच्या बोलण्याचं ऐस..